महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक आल्यावरच शरद पवारांना दुष्काळ आठवतो; परभणीत उद्धव ठाकरेंची टीका

निवडणुका आल्यावरच शरद पवारांना दुष्काळ आठवतो. मागची पाच वर्षे शिवसेना दुष्काळग्रस्तांना मदत करत असताना राष्ट्रवादीचे लोकं घरात बसले होते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

By

Published : Apr 16, 2019, 12:14 AM IST

उद्धव ठाकरे

परभणी- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर परभणीत सडकून टीका केली. निवडणुका आल्यावरच शरद पवारांना दुष्काळ आठवतो. मागची पाच वर्षे शिवसेना दुष्काळग्रस्तांना मदत करत असताना राष्ट्रवादीचे लोकं घरात बसले होते. तर राहुल गांधींवर पुन्हा एकदा शरसंधान करत उद्धव ठाकरे यांनी त्यांना नालायक असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे


परभणीच्या स्टेडियम मैदानावर सायंकाळी सात वाजता महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला जोरदार वादळी वाऱ्यातच उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली. यावेळी वादळी वारे आणि पावसाची भुरभुर सुरू असली, तरी ठाकरे यांचे भाषण सुरूच होते. यावेळी ठाकरे म्हणाले, जिकडे जातो तिकडे वादळ माझ्यासोबत असते. हेच वादळ आता दिल्लीचे तख्त काबीज करणार आहे. सोबतच मी जातो तिकडे शरद पवारही जातात. ते आता चारा छावण्यांना भेट देत आहेत. निवडणुका आल्या की त्यांना दुष्काळाची आठवण होते. आता त्यांना समजले आहे, की राज्यात दुष्काळ आहे. पण मागचे पाच वर्षे शिवसेना दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जात असताना हे राष्ट्रवादीवाले घरात कोंडून बसले होते. शरद पवारांनी ज्या चारा छावणीला भेट दिली, त्या ठिकाणचे लोक घाबरले असल्याचे सांगत आहेत. कारण मागच्या वेळी यांची सत्ता असताना त्यांनी चारा छावण्यांमध्ये शेण घोटाळा केला. या लोकांनी शेण सुद्धा सोडले नाही आणि आता यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केली.


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की परभणी मतदार संघाचे वैशिष्ट्य आहे, हा मतदारसंघ भगव्याचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणून मी विरोधकांना आव्हान देतो, 'तुमचे 56 पक्षच नव्हे तर 56 पिढ्या देखील खाली उतरल्या, तरी परभणी वरचा भगवा तुम्ही खाली उतरू शकणार नाहीत' आजपर्यंत परभणीत ज्याला ज्याला मोठे केले ते निघून गेले. मात्र कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय जाधव हे समर्थपणे उभे आहेत. ज्यांचा खासदार समर्थ असतो, त्यांचे सरकार देखील मजबूत होते. मातीशी इमान राखणाऱ्या संजय जाधव यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन देखील शेवटी उद्धव ठाकरे यांनी केले. या सभेच्या व्यासपीठावर शिवसेना उमेदवार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, माजी आमदार विजय गव्हाणे, सुभाष जावळे, मेघना बोर्डीकर, विठ्ठल रोकडे, शिवसेनेचे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details