परभणी - जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकर्यांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्यातील शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकर्यांना सरासरी पंचनामे ग्राह्य धरून विमा मंजूर करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सीसीआयची किमान दोन खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने शहरात येणार्या चारही मार्गांवर आज 'रास्तारोको' आंदोलन केले. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकर्यांनी सहभाग नोंदवला.
परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा, पेडगाव फाटा, त्रिधारा फाटा व टाकळी कुंभकर्ण या ठिकाणी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दुपारच्या सुमारास पार पडलेल्या या आंदोलनामुळे शहरात येणाऱ्या जिंतूर, पाथरी, वसमत आणि गंगाखेड या प्रमुख चारही महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तास-दीड तास शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून होते. ज्यामुळे या मार्गांवर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
हेक्टरी 50 हजाराच्या मदतीची मागणी
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः मुगाच्या शेंगांना कोंब फुटली आहेत. सोयाबीन व कापूस या दोन्ही पिकांना तडाखा बसला आहे. परतीच्या पावसाने हळद, तूर आणि उसाचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच, अन्य पिकांनाही तडाखा बसला आहे. अशा स्थितीत प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.