परभणी- केंद्रातील भाजप सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. एनआरसी, सीएए या कायद्यांना देशातील मुस्लीम बांधवांकडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाहीन बाग येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणीत देखील मुस्लीम बांधवांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी देशभरात गाजत असलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाला अजूनही विरोध कायम आहे. देशात ठिक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथील शाहीन बाग येथे एनआरसी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीत विविध मुस्लीम सामाजिक संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 'परभणीतही एक शाहीन बाग' असे फलक लावून नागरिकत्व कायद्याविरोधात घोषणाबाजी केल्या जात आहे. तसेच केंद्र शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, दिवस-रात्र सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, तहसीन खान, काँग्रेसचे नदीम इनामदार, वंचित आघाडीचे आलमगीर खान आदींसह विविध पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते भेट देत आहेत. जोपर्यंत कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
हेही वाचा-'महाराष्ट्र शेतकरी शुगर' कारखाना जप्त करा, शेतकरी संघटनेची मागणी