परभणी - लॉकडाऊन, संचारबंदी, नाकाबंदी, कन्टेन्टमेंट झोनची अंमलबजावणी यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्राम मिळाला नाही. या सर्व बाबींचा विचार करुन पोलीस दलासाठी ‘शार्पेन द अॅक्स’ ही मोहिम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. यानुसार परभणी पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना 10 दिवस तर पोलीस अधिकाऱ्यांना 7 दिवसाच्या रजेवर टप्प्या-टप्याने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परभणीत 'लॉकडाऊन'मध्ये सेवा बजावणाऱ्या पोलिसांना मिळणार सुट्टी
परभणी पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना 10 दिवस तर पोलीस अधिकाऱ्यांना 7 दिवसाच्या रजेवर टप्प्या-टप्याने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रथम प्राधान्यानुसार 55 वर्ष वयावरील व ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, हायपरटेन्शन असे आजार आहेत, असे कर्मचारी रजेवर पाठविण्यात येणार आहेत. तर त्यानंतर 55 वर्षावरील वयाचे कर्मचारी व 50 ते 55 वयाच्यावरील आजार असणारे कर्मचारी व त्यांनतर शिल्लक राहीलेले कर्मचारी यांना टप्याटप्याने 10 दिवस रजेवर सोडण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात 68 कर्मचारी व अधिकाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. तसेच ज्यांनी यापुर्वी कोणत्याही प्रकारची रजा उपभोगली आहे, जे कर्मचारी या काळात अनुपस्थीत होते, त्यांना मात्र विश्रांती मिळाल्यामुळे या मोहिमेतून वगळण्यात आले आहे.
ही मोहीम प्रथम सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक शाखेत काम करणारे कर्मचारी नंतर ईतर शाखेत काम करणारे कर्मचारी यांचेसाठी राबविण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत साधारणपणे 30 अधिकारी व 255 कर्मचारी यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रजा उपभोगल्या आहेत. त्यांना या कालावधीत योग्य विश्रांती मिळाली आहे. दरम्यान, या योजनेनुसार आतापर्यंत दोन टप्प्यामध्ये 6 अधिकारी व 96 कर्मचाऱ्यांना रजेवर सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.