परभणी - पंधरा वर्षात तब्बल 42 गुन्हे करणाऱ्या परभणीतील टोळी प्रमुख व्यंकटी शिंदे यासह त्याच्या साथीदारांवर 12 सदस्यांवर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने 3 खून करून 7 खुनांचे प्रयत्न केले आहेत. नुकताच या टोळीचा एक खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला होता. तेव्हा त्या टोळीतील सदस्यांकडून दोन पिस्तूल आणि काही काडतूस जप्त करून त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा - भिवंडी पोलिसांकडून तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 5 टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली असून, आता राजाश्रय असलेल्या या टोळीवर देखील कारवाई झाल्यामुळे टोळी युद्धासारख्या घटनांना लगाम बसेल असे मानले जात आहे.
तत्कालीन नगरसेवक अमरदिप रोडे याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी व स्वत:च्या टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रोडे याच्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी रवी गायकवाड याचा खून करण्याचा कट टोळीप्रमुख व्यंकटी मुंजाजी शिंदे व त्याच्या टोळी सदस्यांनी रचला होता. त्यानुसार गायकवाडला शिवाजी विधी महाविद्यालयात किंवा दिसेल तेथे त्याचा खून करण्याचे नियोजन केले होते. या टोळीने 1 जानेवारी रोजी शिवाजी विधी महाविद्यालयात प्रत्यक्ष रवी गायकवाड याच्या खूनाचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, पोलीसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. त्याच दिवशी टोळीतील सदस्य शेख फेरोज शेख सलीम याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे तर टोळी सदस्य देवेंद्र उर्फ बो श्रीनिवास देशमुख याच्याकडून कोयता आणि खंजिर जप्त करण्यात आला होता.
आरोपींवर नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सचिन अनिल पवार, मनोज भगवान पंडीत यांना देखील अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 10 दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली होती. सध्या या टोळीतील इतर आरोपी फरार आहेत.
व्यंकटी मुंजाजी शिंदे व त्याच्या टोळीने 2005 पासून एकुण 42 गुन्हे केले आहेत. त्यामध्ये खूनाचे 3, खुनाचा प्रयत्न करण्याचे 7 व इतर अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीच्या कामकाजाची पद्धत अतिशय हिंसक व निघृण आहे. सुपारी घेऊन खून करणे, दोन पक्षाच्या वादातील पैशाच्या वसुलीसाठी एका पक्षामार्फत सुपारी घेऊन पैसे वसुल करुन देणे, ज्यामुळे टोळीची दहशत कायम राहिल, अशा पध्दतीने भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी टोळीमार्फत खून घडवून आणणे, असे सातत्याने केले जात होते. टोळीप्रमुख व्यंकटी मुंजाजी शिंदे व टोळी सदस्य भैय्या उर्फ नितेश प्रकाश देशमुख यांना यापुर्वी खूनाच्या गुन्हयात सत्र न्यायालयात जन्मठेपेची व खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात टोळी प्रमुख व्यंकटी मुंजाजी शिंदे याला सात वर्षे कारावासाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली होती. पोलिसांनी हे सर्व अभिलेख एकत्रीत करून त्यांची पडताळणी केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी या टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यावरून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा 1999 (मोक्का) नुसार समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्फत व शिफारशीसह विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड यांना सादर केला होता.
प्रस्तावातील अभिलेखांची व कायदेशिर बाबींची पडताळणी करुन विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी टोळी प्रमुख व्यंकटी मुंजाजी शिंदे व त्याच्या टोळीतील आज पावेतो निष्पन्न झालेल्या 12 सदस्यांविरुध्दच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नितिन बगाटे करत आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्रात घरफोड्या करणाऱ्या 'भाभोर टोळी'च्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या