परभणी - जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरातील महापालिकेकडून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यानंतर आता धूर फवारणीचे काम सुरू झाले आहे. याअंतर्गत शहरातील प्रत्येक चौकात फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धूर फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात निर्जंतुकीकरण सुरू येथील मनपातर्फे शहरात विविध कार्यालय आणि प्रमुख बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड तसेच कॉलन्यांमधील रस्त्यांवर करण्याचे काम सुरू झाले आहे. या अंतर्गत काल परभणी शहरातील महानगरपालिकेच्या इमारतीत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. इमारतीच्या आत मधील प्रत्येक दालनात, प्रवेशद्वारात तसेच बाहेरच्या परिसरात ही फवारणी झाली.
याशिवाय शहरातील शिवाजी चौक भागात सर्व रस्त्यांवर फवारणी करण्यात आली. तसेच गांधी पार्क, क्रांती चौक, स्टेशन रोड, जिल्हा सरकारी दवाखाना आणि शिवाजी चौक तसेच विष्णु नगर आदी भागात ही फवारणी करण्यात आली. तसेच निर्जंतुकीकरण फवारणी सोबतच फॉगिंग मशीन च्या माध्यमातून धूर फवारणी देखील करण्यात येत आहे.
चारचाकीमध्ये बसवण्यात आलेल्या फॉगिंग मशीनमधून रेल्वे स्टेशन, जिंतुर रोड, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर, बस स्थानक, वसमत रोड, आपना कॉर्नर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक आदी भागात फवारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. फवारणीसाठी आयुक्त रमेश पवार, जीवशास्त्रज्ञ विजय मोहरीर यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मलेरिया विभाग प्रभारी विनय ठाकूर व आरोग्य कर्मचारी यासाठी प्रभागांमध्ये फिरून फवारणीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.