परभणी - कोरोनाच्या संकटात महाघाडीच्या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत परभणी शहरात भाजपाच्या वतीने शुक्रवारी 'माझे आंगण माझे रणांगण' या मोहिमेअंतर्गत 'महाराष्ट्र बचाओ'चा नारा देण्यात आला. पाथरीच्या आमदार मेघना बोर्डीकर तसेच महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आणि माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी हे आंदोलन करून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला.
आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात जिंतूर रोडवरील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर 'महाराष्ट्र बचाव आंदोलन' करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारचा निषेध करणारे फलक हातात घेऊन कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. याशिवाय वसमत रोडवर झालेल्या आंदोलनात माजी आमदार रामराव वडकुते, प्रदेश सदस्य प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, रामकिशन रोंदले, भीमराव वायवळ, चंद्रकांत डहाळे, भालचंद्र गोरे आदी जण सहभागी झाले होते.
तसेच शहरात भाजप महानगर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या घरासमोर, चौकात, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत तोंडाला काळ्या फिती लावून, निषेध फलक हाती घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संजय शेळके, विशाल बोबडे व महेंद्र वैरागर यांनीही सहभाग नोंदवला.