परभणी- कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दारूबंदी करण्यात आली आहे. परंतु अनेकजण गैरमार्गाने दारूची विक्री करत आहेत. शिवाय हातभट्ट्या आणि दारू बनवण्याचे वाडे निर्माण होत आहेत. अशाच काही अड्ड्यांवर धाडी टाकून राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ते अड्डे उध्वस्त केले. शिवाय दारूविक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करत 21 गुन्हे दाखल केले आहेत.
गावठी दारूचे अड्डे उध्वस्त; परभणीत लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, 21 गुन्हे दाखल
अड्ड्यांवर धाडी टाकून राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ते अड्डे उध्वस्त केले. शिवाय दारूविक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करत 21 गुन्हे दाखल केले आहेत.
सध्या संचारबंदी असल्याने कोणालाही दारू विक्री करता येत नाही. 21 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने सर्वत्र बंदचे आदेश आहेत. या बंदमध्ये मद्य विक्री पूर्णतः बंद आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकून 21 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत अद्यापपर्यंत 3 हजार 315 किलो दारू बनविण्याचे रसायन, 60 लिटर गावठी दारू, 104 देशी व विदेशी दारूच्या बॉटल, 50 लिटर ताडी असा एकूण 94 हजार 280 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक यु.आर.आव्हाड, दुय्यम निरीक्षक बी.एस.ओव्हाळ, कॉन्स्टेबल आर.ए. चव्हाण, आर.बी.बोइनवाड, बालाजी कचव्हे, एस. एस. मोगले यांनी केली आहे.