परभणी -संपूर्ण देशाला कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारावरील लसीची गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. अखेर ही लस प्रत्यक्षात आली असून, त्यास भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, सोमाणी हे परभणीचे भूमिपुत्र आहेत. ही बाब परभणीकरांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी देखील अभिमानाची बाब आहे.
औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -परभणी: 566 ग्राम पंचायत निवडणुकीसाठी 12 हजार 807 उमेदवारांचे अर्ज वैध
दरम्यान, डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शालेय जीवनापासून आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल माहिती देऊन त्यांची ही यशस्वी वाटचाल त्यांच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
पत्रकार परिषद घेऊन लसींना परवानगी दिल्याची दिली माहिती
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत दोन लसींना मंजुरी दिली आहे. तातडीच्या वापरासाठी ऑक्सफर्ड-अॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीला औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे. कोरोनावरील तज्ज्ञ समितीने या दोन लसींची शिफारस डीसीजीआयकडे केली होती. त्यानुसार भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी नॅशनल मेडिकल सेंटर येथे आज (रविवारी) पत्रकार परिषद घेत या लसींना परवानगी दिल्याची माहिती दिली. कोरोना लसीबाबत निर्णय घेण्यासाठी भारत सरकारने सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अंतर्गत विषय तज्ज्ञ समितीची (SEC) स्थापना केली होती. या समितीने दोन लसींची शिफारस डीसीजीआय कार्यालयाकडे केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे, भारतात लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.
भारतीयांप्रमाणे परभणीकरांना विशेष अभिमान -
विशेष म्हणजे, कोरोनावरील दोन्ही लसी भारतीय बनावटीच्या आहेत. याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. सोबतच या लसींना परवानगी देणारे भारतीय औषधी नियंत्रण विभागाचे प्रमुख हे परभणीचे असल्याने परभणीकरांसाठी ही विशेष अभिमानाची बाब आहे.
..असे आहे डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचे कुटुंब
52 वर्षीय डॉ. वेणुगोपाल सोमानी हे मूळचे परभणी जिल्ह्यातील बोरी येथील रहिवासी आहेत. मात्र, सध्या त्यांचे कुटुंबीय परभणी शहरातील श्रीराम नगरात वास्तव्याला आहे. त्यांचे वडील भारतीय स्टेट बँकेतून सेवानिवृत्त झाले असून, त्यांना एकूण तीन मुले आहेत. त्यापैकी डॉ. वेणुगोपाल हे ज्येष्ठ पुत्र आहेत. अन्य दोन पैकी लहान मुलगा ठाणे येथे सरकारी नोकरीत असून, दोन नंबरचा मुलगा शेती पाहतो.
कुटुंबीयांनी व्यक्त केला अभिमान
देशाच्या उच्चपदस्थ आणि सध्या चर्चेत असलेल्या खात्याचे प्रमुख असलेल्या डॉ. वेणुगोपाल यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांची भावना जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत' च्या परभणी प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. यावेळी डॉ. वेणुगोपाल यांचे कार्य आमच्यासह परभणीकरांचा गौरव असल्याचे त्यांचे वडील गिरधारीलाल सोमाणी यांनी सांगितले. तसेच, डॉ. वेणुगोपाल हे लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असल्याचे ते म्हणाले. त्यांचे शालेय शिक्षण बोरी या खेडेगावात झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथे झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथून औषधनिर्माण-शास्त्र शाखेची पदवी घेतली, आणि त्या ठिकाणीच त्यांनी पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर मुंबई येथे औषध निर्माण खात्यात रुजू झालेले डॉ. वेणुगोपाल गेल्या 28 वर्षांपासून या खात्यात कार्यरत आहेत. आज देशाच्या औषध निर्माण खात्याच्या प्रमुखस्थानी पोहोचल्याचे गिरधारीलाल सोमाणी यांनी सांगितले.
देशवासीयांचे आशीर्वाद मिळणार - आई लीलाताई
वडिलांप्रमाणेच त्यांची आई लीलाताई सोमाणी यांनी देखील आपल्या मुलाबद्दल आपल्याला खूप अभिमान असल्याचे सांगितले. कोरोनामुळे संपूर्ण देश परेशान होता आणि त्यावरील लसीला आपल्या मुलाने मान्यता दिल्याबद्दल त्याला देशवासीयांचे आशीर्वाद मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर, त्यांचे बंधू मनोज सोमाणी यांनी आपल्या भावाने प्रसिद्धीसाठी नव्हे तर एक कर्तव्य म्हणून आपले कार्य पूर्ण केले, असे सांगितले.
जगातील सर्वात मोठे लसीकरण भारतात होणार -
काल (शनिवार) देशभरातील अनेक रुग्णालयांत कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणी, लसीची साठवणूक आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने झाले आहे का? याची चाचपणी करण्यात आली. ऐनवेळी लसीकरणात कोणत्या अडचणी येतात, त्या शोधून त्यावर काम करण्यासाठी ही रंगीत तालीम होती. भारतामध्ये एक कोटीपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे, जगातील सर्वात मोठे लसीकरण भारतात होणार आहे.
हेही वाचा -परभणी: 566 ग्राम पंचायत निवडणुकीसाठी 12 हजार 807 उमेदवारांचे अर्ज वैध