परभणी -घर बांधण्यासाठी माहेराहून 50 हजार रुपये आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे 7 महिन्याच्या गर्भवती विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणात सदर विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने पतीसह सासूला परभणी न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना मानवत तालुक्यातील सावरगाव येथील असून, पाच वर्षापूर्वीच्या या खटल्याचा आज (मंगळवारी) न्यायालयाने निकाल दिला आहे.
पूजा अमोल एडके असे या आत्महत्याग्रस्त महिलेचे नाव आहे. या विवाहितेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना 5 फेब्रुवारी 2015रोजी रोजी घडली होती. याबाबत मानवत पोलीस ठाण्यात मृत विवाहितेची आई रसिकाबाई सटवाजी ढवळे यांनी फिर्याद दिली होती.
चरित्र्यावरही घेत होते संशय
मयत पूजा हिचे लग्न अमोल भागोजी एडके (रा. सावरगाव, ता. मानवत, जि. परभणी) याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर सासू कांताबाई भागोजी एडके व नवरा अमोल एडके यांनी घर बांधण्यासाठी माहेराहून 50 हजार आण म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करुन चारित्र्यावरदेखील संशय घेतला. ती 7 महिन्यांची गर्भवती असताना 5 फेब्रुवारी 2015रोजी सासरच्या राहत्या घरी पुजाने स्वत:ला पेटवून घेतल्याने ती जळून मरण पावली. त्यावरुन आरोपी कांताबाई भागोजी एडके (सासू) व अमोल एडके (नवरा) यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.