परभणी -अल्पावधीतच परभणीचे दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे सहाय्यक पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांची बदली झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर उपविभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या अबिनाशकुमार यांची नियुक्ती झाली. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या गृह विभागाने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये परभणी जिल्ह्यातील अन्य तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटेंसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा परभणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे पुण्यात एका खासगी कंपनीत देखील काम केले आहे.
परभणी जिल्ह्यातून बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीले यांची लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, तर परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांची नाशिक जिल्ह्यातील कळवणला बदली झाली आहे. पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले यांची ठाणे येथील नागरी हक्क संरक्षण विभागात उपअधीक्षक पदावर बदली करण्यात आली.
नितीन बगाटे दोन वर्षापूर्वी परभणीत रुजू झाले होते. रुजू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात परभणीत विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांची तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी बाचाबाची झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परभणीतील सभेत ‘डी झोन’मध्ये शिरलेल्या कार्यकर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केल्यावरुन बगाटे आणि धनंजय मुंडे यांच्यात हा वाद झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळूचे टिप्पर पकडल्यावरुन त्यांचा खासदार संजय जाधव यांच्याशी देखील वाद झाला होता. त्यांच्या विरोधात खासदार संजय जाधव यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.