परभणी - आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या महिलांचा आज (शुक्रवारी) परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा धडकला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.
परभणीत 'आशां'सह गटप्रवर्तकांचा जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा
आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या वेतनात तिप्पट दरवाढीचा जीआर काढण्यात यावा. तसेच वेतन निश्चिती मिळावी, या मागणीसाठी 3 सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. आशा संघटनेच्या महिलांचा परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा धडकला.
आशांच्या या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी संघटनेचे नेते बाबाराव आवरगंड यांनी केले. दरम्यान, शहरी व ग्रामीण आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या वेतनात तिप्पट दरवाढीचा जीआर काढण्यात यावा. तसेच वेतन निश्चिती मिळावी, या मागणीसाठी 3 सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. आशा व गट प्रवर्तक कृती समितीबाबत शासकीय निर्णय जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. शासनाशी संघटनेने वाटाघाटी व चर्चा केली. मात्र शासनाने जीआर काढून अंमलबजावणी केली नाही. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आशांना दरमहा 10 हजार रूपये व गट प्रवर्तक यांना 15 हजार रुपये किमान मानधन सुरु करण्यात यावे, आशा गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागु करण्यात यावी, याकरता हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
याप्रसंगी बाबाराव आवरगंड यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना भेटून निवेदन देण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची जागेवरच अटक करून सुटका केली.