परभणी -विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण करण्यासाठी तसेच शाळेचे स्वरूप आगळेवेगळे करण्याच्या उद्देशाने अनेक शाळा सजविण्यात येतात. मात्र, पालम तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद शाळा चक्क रेल्वेच्या स्वरुपात रंगवण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून हे अनोखे अभियान राबविले जात असून या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, डिजिटल शाळेसाठी संगणक तसेच स्मार्ट टीव्हीद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणात समरस करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्र ग्राम परिवर्तन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १८ गावे निवडण्यात आली. त्यात पालम तालुक्यातील आडगाव या गावाचा समावेश आहे. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना गावकऱ्यांच्या मदतीने गावात राबवणे, त्यातून शाश्वत विकासाची संकल्पना पुढे नेणे, हे मुख्य काम महाराष्ट्र ग्राम परिवर्तन संस्थेचे (व्हिएसटीएफ) आहे. त्यात आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आधुनिक साहित्य, साधने व रंगरंगोटी करून ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. शाळेचे रूप पालटल्याने विद्यार्थ्यांचा उत्साहात वाढ होऊन शाळेत विद्यार्थीसंख्याही वाढल्याचे दिसत आहे. तसेच गावात शौचालयाची योजना, आरोग्यासाठी लसीकरण, जनावरांचे लसीकरण, स्वच्छता अभियान, अंगणवाडीसाठी साहित्य आदी कामे देखील होत आहेत.