परभणी - शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त 2 दिवसांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 2 आणि 3 ऑगस्ट रोजी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात पालम येथून शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. पालम येथे युवक व शेतकरी बांधवांशी आदित्य संवाद साधणार आहेत. त्यानंतर 12 वाजता गंगाखेड येथील साई वृंदावन मंगल कार्यालयात 'विजय संकल्प मेळाव्यास' मार्गदर्शन करणार आहेत. तर दुपारी 2 वाजता पाथरी मतदारसंघातील पोखर्णी येथील शेतकरी व युवकांशी ते संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता पाथरीच्या शिवाजी चौक येथे युवक व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर 4 वाजता मानवत येथील नेहा मंगल कार्यालयात विजयी संकल्प मेळावा होणार आहे.
सायंकाळी 6 वाजता सेलू येथील रायगड कॉर्नर येथे मोटार सायकल रॅली निघणार आहे. सेलू येथे जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सेलू येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात जनतेशी संवाद साधून मागील 5 वर्षात जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांस आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शेती उपयोगी रासायनिक खताच्या बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमाचे आयोजन सेलू-जिंतूर विधानसभा प्रमुख राम पाटील यांनी केले आहे.
तर 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील नूतन शाळा येथे रोजगार मेळावा व दिव्यांगाना मोफत साहित्याचे वाटप कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी ते जनआशीर्वाद यात्रेनिमित्त उपस्थितींशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यामध्ये खासदार संजय (बंडू) जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, विधानसभा प्रमुख राम पाटील, बाळासाहेब निरस, माणिक पोंढे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, लोकप्रतिनधी व शिवसेना-युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक-युवासैनिक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना जिल्हा युवा अधिकारी अर्जुन सामाले व दिपक बारहाते यांनी केले आहे.