परभणी - समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा यांना छेद देण्याचे काम सामाजिक कार्यकर्तेच करतात असे नाही, तर ते काम एखादा सामान्य माणूसही करू शकतो. याचे जीवंत उदाहरण म्हणून परभणीतील जिलेबी विक्रेता सन्नी सिंह यांच्याकडे पाहता येईल. सन्नी सिंह हे गेल्या दहा वर्षांपासून स्त्री भ्रूण हत्या थांबाव्यात, या उद्देशाने नववर्षाच्या पहिल्या दिवशी कन्यारत्न जन्म देणाऱ्या शहरातील सर्व हॉस्पिटलमधील महिलांना प्रत्येकी दोन किलो जिलेबी भेट देतात. शिवाय त्यातून एका भाग्यवान मातेला सव्वा ग्राम सोन्याचे नाणे देखील भेट ( Baby Girl Honoured With Gold Coin ) देतात. यावर्षी देखील त्यांचा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
लक्की ड्रॉ काढून एका कुटुंबाला भेट -
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला कन्यारत्नाला जन्म देणार्या एका भाग्यवान कुटुंबाला येथील हरियाणा जिलेबीचे चालक सन्नी धरमवीरसिंह दामोदर यांच्याकडून सव्वा ग्रॅम सोन्याचे नाणे आणि 2 किलो जिलेबी भेट देण्यात येते. त्यांचा हा उपक्रम मागील 10 वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार यावेळी देखील 1 जानेवारी 2022 या दिवशी त्यांनी जिल्हा रुग्णालयात कन्यारत्नास जन्म देणाऱ्या 13 कुटुंबांमधून लक्की ड्रॉ काढून एका कुटुंबाला ही भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
40 वर्षांपासून जिलेबीच्या व्यवसायात -
परभणी येथील स्टेशन रोडवरील हरियाणा जिलेबी या छोट्याशा दुकानाचे चालक म्हणजे धरमवीरसिंह व त्यांचा मुलगा सन्नी सिंह हे दोघेजण मागील 40 वर्षांपासून आपले जिलेबीचे दुकान चालवतात. या ठिकाणी व्यवसाय करत असतांना आपण काही समाजोपयोगी काम केले पाहिजे, असा त्यांचा विचार असायचा. त्यातूनच त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली.