पालघर (वाडा) -कोहज किल्ल्यावरुन ट्रेकिंग करुन परतणाऱ्या तरुणीचा शेलटे गावातील बंधाऱ्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२९ जुलै) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. टिंकल शहा (२१, रा. बोरीवली, मुंबई) असे या घटनेतील मृत तरुणीचे नाव आहे.
पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू; पालघर जिल्ह्यातील घटना
पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची घटना वाड्यातील शेलटे गावात घडली आहे.
वाडा तालुक्यात वाडा-मनोर महामार्गावर कोहज किल्ला आहे. या किल्ल्यावर पर्यटनासाठी मुंबई व इतर जिल्ह्यातील पर्यटक गिर्यारोहण आणि पर्यटनासाठी येत असतात. सोमवारी (२९ जुलै) मुंबईतील ४ मुले व २ मुली कोहज किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे शेलटे येथील बंधाऱ्याचा पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे किल्ल्यावरुन परतताना बंधाऱयातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे २ तरुण व १ तरुणी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. यात २ तरुणांनी झाडांचा आधार घेतल्यामुळे ते वाचले. मात्र, टिंकल नावाच्या तरुणीचा यात मृत्यू झाला असून तिचा मृतदेह एका तासाने सापडला.
घटनेनंतर ३० जुलैला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन तरुणीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला, अशी माहिती वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.