पुणे - राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर जादूटोणा केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला शोधून अटक करून कठोर कारवाई करा, या मागणीसाठी आज पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य सूत्रधार मोकाट
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असली तरीही या मागचा मुख्य सूत्रधार कोण, ते शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत शिवसैनिकांनी पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होण्यासाठी करण्यात आला जादूटोणा
विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करण्यात आला. एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा व शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.
दोघांना अटक; सूत्रधाराचा तपास सुरू
पालघरचे उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून जादूटोणा करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी या दोन्ही आरोपींवर विरोधात पोलीस स्टेशमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अजूनही महाराष्ट्रात सुरू आहेत आघोरी प्रथा
महाराष्ट्र राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळी वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अमलात आणला. मात्र अजूनही या अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात.