पालघर- मनोर येथील सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मिलिंद निकोले, असे मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी (दि. 31 जानेवारी) कबड्डी खेळताना मिलिंदच्या हाताला फॅक्चर होते. त्यानंतर त्याला मनोरच्या सह्याद्री या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
...तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, मृताच्या नातेवाईकांचा पवित्रा
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जीव गेल्याने डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
फॅक्चर असल्याचे सांगत डॉक्टरांनी मिलिंद यांच्या हाताची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला. दरम्यान, शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) दुपारी 2 वाजेच्या सुमारास मिलिंदला शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मात्र, ऑपरेशन झाल्यानंतर मिलिंद पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. तरुणाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे सांगत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मिलिंदच्या नातेवाईकांनी घेतली, तर मिलिंदला वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला, अशी माहिती संबंधित डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - वाडा-गोऱ्हे-गालतरे रस्त्याच्या कामात दिरंगाई; विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट