पालघर - मित्राबरोबर निर्जन रस्त्यावर बोलत बसलेल्या मुलीच्या मित्राला झाडाला बांधून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना विरारमध्ये घडली होती. या प्रकरणी एका नराधमाला विरार पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार मात्र अजूनही फरार आहे. अत्याचाराची ही घटना १५ एप्रिलच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली होती.
विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरण; एक आरोपी गजाआड, एक फरार
सुधाकर सुळे (२६) याला अकलूज येथून पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
विरारमधील जीवदानी रस्त्यावरील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या मागील निर्जन रस्त्यावरून १५ वर्षाची पीडित मुलगी आपल्या मावस बहिणीकडे जात होती. दरम्यान, तिचा मित्र भेटल्याने ती रस्त्यातच बोलत बसली. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी पीडित मुलीच्या मित्राला मारहाण करत झाडाला बांधून ठेवले आणि मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. विरार पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी विरार पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले होते.
घटनास्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने तसेच काहीच पुरावा नसल्याने आणि अंधारात मुलीने आरोपींना नीट पाहिले नाही. त्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यात अडचणी येत होत्या. एका आरोपीकडे रिक्षाचा बॅच असल्याची माहिती पीडित मुलीने दिली होती. त्यानुसार आरोपी रिक्षाचालक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांच्या तपासात मागील १४ दिवसांपासून फरार असलेला व विरारच्या सहकार नगरमध्ये रिक्षा चालवणारा आरोपी सुधाकर सुळे (२६) याला त्याच्या गावी, अकलूज येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेला आरोपीचा एक साथीदार मात्र फरार आहे. लवकरच तो पकडला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.