पालघर- विरारमध्ये पैशाच्या वादातून एका बेकरी कामगाराची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रियासत अली अन्सारी (वय 30 वर्षे), असे या मृत कामगारांचे नाव असून शाबूत शेख, असे हल्लेखोराचे नाव आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शाबूत शेख याला अटक करण्यात आली आहे.
विरार पूर्व येथील पाच पायरी परिसरात डीलक्स नावाची बेकरी आहे. या बेकरीमध्ये रियासत आपल्या साथीदारांसह कामगार म्हणून राहत होता. बुधवारी (दि. 18 मार्च) सकाळी ग्राहकाच्या पैशाच्या कारणावरून रियासत व शाबूत या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. याचा राग मनात ठेवून नेहमीप्रमाणे बेकरीतील सर्व कामगार झोपल्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास शाबूत शेख हा रियासत झोपला असलेल्या खोलीत धारधार शस्त्र घेऊन गेला. कोणी आपल्याला बघत नसल्याची खात्री केल्यानंतर धारदार शस्त्राने रियासत याच्या मानेवर वार करून बाजूच्या खोलीत पळ काढला.