पालघर/वसई - अॅमेझॉनने आपल्या ऑनलाईन खरेदी विक्रीच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यास नकार दिल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसेने ॲमेझॉनच्या जाहिरांतीचे होंर्डिंग फाडले होते. त्यानंतर ॲमेझॉनकडून दिंडोशी न्यायालयामार्फत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली. त्यावर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी वसई पूर्वेच्या सातवली येथील ॲमेझॉन कार्यालयाची शुक्रवारी सायंकाळी तोडफोड करत ॲमेझॉनला मनसे स्टाईलने खळ्ळ खट्याकचा दणका दिला आहे.
गुन्हा दाखल-
वसई पूर्वेकडील सातिवली येथे ॲमेझॉन कंपनीचे कार्यालय आहे. त्या कार्यालयात नालासोपारा मनसेचे रवी पाटेकर, राज नागरे, विकास जैतापकर, संतोष परब यांच्यासह सात आठ कार्यकर्त्यांनी मराठीचा अपमान करणाऱ्या ॲमेझॉन कंपनी विरोधात घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी वालीव पोलिसांनी सुमारे सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता त्या मनसे कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत.
मनसेचे अॅमेझॉन विरुद्ध खळ्ळ-खट्याक.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात अमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेला स्थान मिळावे, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, विनंती करूनही अमेझॉनने दखल न घेतल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. अॅमेझॉनकडून राज ठाकरेंना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर मनसैनिका आक्रमक झाले आहेत. अॅमेझॉनच्या या नोटीस प्रकरणी संताप व्यक्त करत मनसे कार्यकर्त्यांनी अमेझॉनचे सातिवली, वसई मधील ऑफिस तोडले आहे.
पुण्यातही तोडफोड-
अॅमेझॉनकडून राज ठाकरे यांना नोटीस येताच, पुण्यातील मनसैनिकांनी देखील कोंढवा येथील अमेझॉनचे कार्यालय फोडले आहे. जोपर्यंत अमेझॉन मराठी भाषेचा सन्मान करत नाही तोपर्यंत असेच काचा फुटण्याचे आवाज येत राहील, असाच इशारा मनसैनिकांनी दिला आहे.