पालघर (वाडा) - तालुक्यातील कुडूस येथील ग्रामपंचायत हद्दीतील आयडीबीआय बँकेच्या एटीएम मशिनवर दरोडा घालत दरोडेखोरांनी ९ लाख ५९ हजार रूपयांची रोकड चोरुन नेली आहे. हा धाडसी दरोडा १३ जूनला पहाटे ३ वाजता घडला. दरोड्याची घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकाराला बँकेची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था कारणीभूत असल्याचा आरोप व्यापारी व बँकेच्या ठेवीदारांनी केली आहे.
वाडा तालुक्यातील वाडा-भिवंडी महामार्गावरील कुडूस हद्दीत महामार्गाजवळ उत्सव काॅम्पलेक्समध्ये आयडीबीआय बँक, टिजेएसबी बँक व एक प्लाऊड सेंटर आहे. तळमजल्यावर आयडीबीआयची बँक आणि त्याच्या शेजारी एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी १३ जूनला पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून ९ लाख ५० हजार रूपये लंपास केले. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीमधून ओळख पटू नये, म्हणून तोंडाला रुमाल बांधला होता. एवढेच नाहीतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेचे कनेक्शनही तोडले होते. या घटनेवेळी बँकेचा सुरक्षा रक्षक घटनास्थळी उपस्थित नव्हता.