पालघर - महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवासी व नागरिकांसाठी कोरोना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच त्यांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे.
भिलाडमध्ये होते प्रवासी आणि नागरिकांची तपासणी -
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या गुजरातमधील भिलाड येथे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांची तपासणी केली जात आहे. गुजरात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांमार्फत महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवासी व नागरिकांची कागदपत्रे तपासली जात आहेत. ज्या प्रवाशांकडे कोरोना RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे, अशांनाच गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे. अन्यथा, महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातूनच त्यांना महाराष्ट्रात परत पाठवले जात आहे. मोठ्या प्रमाणात तपासणी होत असल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तपासणी नाक्याच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.