मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊनमुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील स्थानिक व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. पेंटीग, डायमेकिंग, पर्यटनासह विविध व्यवसाय ठप्प झाले आहेत. या व्यवसायातील कारागीरांवर मोठे संकट ओढवले आहे. व्यवसाय करण्यासाठी बँकेतून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत येथील व्यावसायिक, कारागीर पडले आहेत.
रत्नागिरीतील हॉटेल-लॉजिंग व्यवसायाला कोरोनाचा फटका, कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प रत्नागिरीतील हॉटेल-लॉजिंग व्यवसायाला कोरोनाचा फटका, कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प
रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 500 ते 550 हॉटेल्स आणि लॉज आहेत. मोठ्या हॉटेल्स-लॉजचं हंगामात दिवसाचं उत्पन्न जवळपास 1 लाख ते लाखाच्या पुढे असतं, तर छोट्या हॉटेल्सचं उत्पन्न हंगामात दिवसाला 30 ते 40 हजार असतं. त्यामुळे एका हॉटेलची दिवसाची सरासरी 70 ते 75 हजार रुपये पकडली, तरी 500 हॉटेल्सची दिवसाला किमान साडेतीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल होते. या तीन ते चार महिन्यांत होणाऱ्या उत्पन्नावर पुढील काही महिन्यांची बेगमी हॉटेल व्यावसायिक करत असतात. कारण पावसाळ्यात जवळपास 4 ते 5 महिने या व्यवसायात मंदी असते. त्यामुळे या महिन्यांतील खर्चाचं नियोजन हंगामात होणाऱ्या उत्पन्नातून करावं लागतं.
रत्नागिरीतील आंब्याची निर्यात निम्म्याने घटली, मात्र तरीही हापूसची बाजी यावर्षी ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि देशभर लॉकडाऊन सुरू झाला. सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे. 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊन सुरू झाल्याला उलटला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुर्णतः ठप्प झाला. करोडोंची उलाढाल ठप्प झाली. अलीकडे होम डिलिव्हरीला परवानगी मिळाली आहे, मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे खर्च कसे भागवायचे, कामगारांचे पगार कुठून द्यायचे, टॅक्स कसा भरायचा असे अनेक प्रश्न हॉटेल व्यवसायिकांसमोर उभे आहेत. कर्जाचे हप्ते ऑगस्टपर्यंत न भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर काय, लाखोंचे हप्ते कसे फेडायचे असा गहन प्रश्नही हॉटेल व्यावसायिकांसमोर उभा आहे.
यावर्षी रत्नागिरीतील आंब्याची निर्यात निम्म्याने घटली, मात्र तरीही हापूसची बाजी
रत्नागिरीतील आंब्याची निर्यात निम्म्याने घटली, मात्र तरीही हापूसची बाजी कोकणात आंबा आणि काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र निर्यातीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला थेट फायदा मिळवून देणारं पीक म्हणून आंब्याकडे पाहिलं जातं. आंब्याची निर्यात ही जगभर होत असते. आंब्याची निर्यात प्रामुख्याने मुंबईतून होते. दरवर्षी साधारणतः भारतातून 38 ते 40 हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होत असते. यामध्ये हापूसचा वाटा 15 ते 20 टक्के आहे. म्हणजेच जवळपास 7 ते 8 हजार मेट्रिक टन एवढी हापूसची निर्यात होते.
मध्य-पूर्वेतील देश त्याचबरोबर इंग्लंड तसेच युरोप खंडातील देश अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जपान या देशांमध्ये आंब्याची निर्यात होते. पण प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. कोरोनाचं ग्रहण आंबा निर्यातीलाही लागलं. हवाई वाहतूक गेले 2 महिने पूर्णतः बंद आहे. त्यामुळे हवाईमार्गे ज्या देशांमध्ये आंबा निर्यात व्हायचा, त्या देशांमध्ये यावर्षी आंबा निर्यात होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी जी निर्यात झाली ती मध्यपूर्व देश तसेच युरोपमध्ये समुद्रमार्गे झाली. गेल्यावर्षी 1 एप्रिल ते 19 मे 2019 मध्ये या कालावधीत महाराष्ट्रातून आंब्याची निर्यात 16 हजार 746 मे. टन झालेली होती. यावर्षीचा विचार केला, तर 1 एप्रिल 2020 ते 19 मे 2020 या कालावधीत 8 हजार 640 मे. टन आंब्याची निर्यात झालेली आहे. आंबा निर्यात जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत 52 टक्के झालेली असली, तरी या निर्यातीत हापुसचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यांच्या सीमा बंद होत्या. बाजार समित्याही बंद होत्या. त्यामुळे निर्यातदारांना इतर राज्यातील आंबा सहज उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे यावर्षी मुंबईतून जी निर्यात झाली, त्यामध्ये हापूसचाच वाटा मोठा असल्याची माहिती कृषी पणन मंडळाच्या कोकण विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली
कारागिर हतबल; डहाणू परिसरातील डाय मेकिंग व्यवसायावर 'कोरोनाची कुऱ्हाड' डहाणू परिसरातील डाय मेकिंग व्यवसाय ठप्प
पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात असलेल्या तारापूर, चिंचणी, वरोर, वाढवण, डहाणूखाडी, गुंगवाडा, तनाशी या परिसरात असलेल्या गावांमाध्ये पारंपरिक सोन्या चांदीचे दागिने बनविण्याचे डाय (साचे) तयार करतात. डायमेकिंग हा या परिसरातील लोकांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून जवळपास १५ ते २० हजार कारागीर या व्यवसायावर अवलंबून आहेत. एका डायची किंमत १० हजारापासून ते १ लाख रुपयांपर्यंत असून, त्यामुळे या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होते. येथे बनणाऱ्या या विविध प्रकारच्या डायची देश, विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. दागिने बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या डायसाठी दुबई, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूरसह इतर देशातही याला मागणी असून ते मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मोठमोठ्या शहरातील सोन्या-चांदीचे दुकाने, बाजारपेठा, कारखाने बंद झाले. त्यामुळे या डायची मागणी घटली. डायची ऑर्डर देण्यासाठी येणारे ग्राहक देखील येणे बंद झाले. शिवाय तयार झालेले डाय घेण्यासाठी व पाठवण्याची देखील व्यवस्था नसल्याने डाय मेकिंग व्यवसाय ठप्प झाला आहे.
कोरोनामुळे डायमेकिंगचे संपूर्ण व्यवसायचक्र कोलमडले असून या व्यवसायात काम करणाऱ्या नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्यवसाय सोपा व्हावा, म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन अनेकांनी आधुनिक पद्धतीच्या सीएनसी मशीन खरेदी केल्या. मात्र आता हाती कामच नसल्याने बँकांचे कर्ज फेडावे कसे? या विवंचनेत येथील कारागीर पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे डायमेकिंगसारखा लघुउद्योग ठप्प झाल्याने असून या व्यवसायात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे डायमेकर व्यवसायिक, कारागीरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या लघु उद्योगाला सरकारने मदत करावी, अशी मागणी येथील डायमेकर्सकडून करण्यात येत आहे.
पर्यटनावर आधारित रोजगाराला लॉकडाऊनचा फटका रत्नागिरीतील पर्यटनावर आधारित रोजगाराला लॉकडाऊनचा फटका
कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनला दोन महिने झाले आहेत. सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या कोरोनाच्या लढाईत अनेक सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचेही हाल तर बघवत नाहीयेत. पर्यटनावर अवलंबून असणारे तर हतबल झाले आहेत.
दरवर्षी कोकणात लाखो पर्यटक येत असतात. कोकणातील अनेक पर्यटन स्थळे जगप्रसिद्ध आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत गोव्यात पर्यटकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा कोकणातही मिळू लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणात स्थिरावू लागली आहेत. पर्यटन वाढत असल्याने साहजिकच त्यावर आधारित अनेक छोटे-मोठे रोजगार इथे निर्माण झाले. मात्र या कोरोनामुळे हे रोजगार धोक्यात आले आहेत. कुटुंब कसे चालवायचे, या विवंचनेत सध्या ते आहेत.
पर्यटनावर आधारित रोजगाराला लॉकडाऊनचा फटका विशाल शिंदे या त्यापैकीच एक. मूळचा धुळे जिल्ह्यातील असलेला विशाल गेल्या १५ वर्षांपासून गणपतीपुळेत आहे. त्याचा रोजगार हा इथल्या पर्यटनावर अवलंबून होता. इथे आलेल्या पर्यटकांना उंटाची सफारी घडवण्याचे काम तो करायचा. त्याच्याकडे ४ उंट आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटन बंद असल्याने विशाल यांचा व्यवसायही ठप्प आहे. त्यामुळे कोकणात पर्यटकांना उंट सफारी घडवणाऱ्या विशाल यांना सध्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागतोय.पर्यटन बंद असल्याने, व्यवसाय ठप्प, व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक चणचण. हातात पैसा नसल्याने उंटांचं खाद्य आणायचे कसे, त्यांना काय खायला घालायचे तसेच कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे उटांच्या चाऱ्याचा प्रश्न तर दुसरीकडे कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न शिंदे कुटुंबीयांसमोर आहे. पण आज ना उद्या हे सर्व सुरळीत सुरू होईल, हा आशेवर सध्या शिंदे कुटुंबीय दिवस ढकलत आहे.