उदयकुमार आहेर यांची प्रतिक्रिया पालघर :राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदय कुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खरे राजकीय वारसदार अजित पवारचं असल्याचा दावा आहेर यांनी केला आहे. ते आज बोईसरमध्ये बोलत होते.
कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश :अजित पवार गटानं आज पालघर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोईसरमध्ये बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर, महिला प्रदेश सरचिटणीस वैशाली जवंजाळ, प्रदेश सरचिटणीस पंजाबराव देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उदयकुमार आहेर यांच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश केला.
अजित पवार भावी मुख्यमंत्री? : सध्या बोईसर विधानसभेत महायुतीतील घटक पक्ष बहुजन विकास अघाडीचे आमदार आहेत. मात्र असं असतानाही आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस या मतदार संघात उमेदवारी देणार असल्याचं सूचक विधान आहेर यांनी केलं आहे. येणाऱ्या काळात अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील आहेर यांनी दिल्या आहे. मात्र, पत्रकारांनी फडणवीसांबद्दल विचारल्यावर त्यांचं ते पाहून घेतील असं वक्तव्य केलं आहे.
अजित पवारचं खरे वारसदार : राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनं गट तट असा वाद करु नये. राष्ट्रवादी काँग्रेसच एकच पक्ष आहे. त्यामुळं आपल्या नेत्याला मुख्यमंत्री पदी बसवण्यासाठी आत्तापासूनच निवडणुकीची तयारी करावी असं देखील ते म्हणाले. तसंच त्यांनी शरद पवारांचे खरे राजकीय वारसदार अजित पवारचं असल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळं राष्ट्रवादीच्या खऱ्या वारसदार सुप्रिया सुळे आहेत की, अजित पवार हे येणारा काळच ठरवेल.
हेही वाचा -
- ..अन्यथा गाठ मराठ्यांशी; नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा
- देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी
- ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानीकडून वसंतदादा कारखान्यासमोर जोरदार राडा