उस्मानाबाद- तुळजापूर तालुक्यातील शेतकरी कृष्णा सोनवणे यांनी आपल्या शेतात गवारीची लागवड केली आहे. ती विकण्यासाठी ते मंगळवारी (दि.28 एप्रिल) उस्मानाबाद येथील मंडई आले होते. यावेळी तेथील व्यापाऱ्यांबरोबर गवार विक्रीची चर्चा करत असताना, गाडीवर ठेवलेले त्यांचे गवारीचे पोते चोरीला गेले.
शेतकऱ्याची विक्रीस आणलेली भाजी चोरीला, पोलीस म्हणतात जाऊ द्या तक्रार देऊन काय होणार..?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अत्यावश्यक सेवा वगळता टाळेबंदी सुरु आहे. या काळात शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करण्याची मुभा आहे. पण, तुळजापूरहून उस्मानाबाद येथील मंडईत आपल्या मालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा माल डोळ्या देखत चोरीला गेला. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी तो शेतकरी गेल्यानंतर त्यांना तक्रार देऊन काय होणार जाऊ द्या आता, असा सल्ला देण्यात आले असल्याचे शेतकरी कृष्णा सोनवणे यांनी सांगितले.
त्यानंतर कृष्णा यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच गवारीचे पोते काही महिला घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर कृष्णा सोनवणे यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना गवारी असलेल्या पोत्याची चोरी झाली असल्याची माहिती दिली. गवार घेऊन जात असलेल्या महिलांचे फोटोही दाखवले. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर सोनवणे यांनी पोलिस ठाणे गाठले. येथे आल्यानंतर उलट सोनवणे यांना 'तक्रार देऊन काय होणार जाऊ द्या', असा सल्ला देत घरी जाण्यास सांगितले. सोनवणे यांची तक्रार घेतली नाही, असा आरोप कृष्णा सोनवणे यांनी केला आहे.
हेही वाचा -कोहळा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, 30 टन कोहळ्याचा ढिगारा शेतातच