'शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते तर अर्जुन खोतकर माझे चांगले मित्र'
शरद पवार व अर्जुन खोतकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर न देता रावसाहेब दानवे यांनी दोन पावले माघार घेत शरद पवारांना महाराष्ट्राचे मोठे नेते व अर्जुन खोतकर यांना मित्र संबोधले.
उस्मानाबाद - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हे सरकार दोन महिन्यात नाही तर कधीही पडू शकते आणि भाजप सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर शरद पवार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलेल्या टीके संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले शरद पवार यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही असे म्हणत शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले तर अर्जुन खोतकर यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर देत अर्जुन खोतकर हे माझे जवळचे मित्र आहेत. माझ्या आणि त्यांच्यात नेहमी चर्चा होत असतात. त्यांच्यामुळे मला ताकद मिळते व माझ्यामुळे खोतकर यांना ताकद मिळत असल्याचे सांगत अर्जुन खोतकर आणि शरद पवार यांनी केलेल्या टीकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर देणे टाळले.