उस्मानाबाद- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर उस्मानाबादमध्ये मोदी लाट कायम असल्याचे पाहायला मिळाले. दोन भावांमध्ये झालेल्या या लढतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना चितपट केले आहे.
उस्मानाबादमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचा विजय, वंचित आघाडीचा फटका शिवसेनेला या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडे आहेत. मात्र, बार्शी वगळता या सर्व विधानसभा मतदारसंघानी शिवसेनेच्या उमेदवाराला बहुसंख्य मतांनी आघाडीवर ठेवले आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ 40 वर्षे राष्ट्रवादीकडेच होता. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी 35 वर्ष एक हाती सत्ता ठेवली होती. तर गेल्या 5 वर्षापासून राणाजगजितसिंह पाटील यांनी या मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2009 ते 2014 या 5 वर्षात आमदार होते. ही 5 वर्षे वगळता हा मतदार संघ डॉ. पाटील म्हणजे राष्ट्रवादी कडेच होता. मात्र, या सर्वच मतदारसंघांना सुरुंग लावत मोदी लाटेमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 1 लाख 27 हजार मतांनी राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. या मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही चांगले मताधिक्य घेतले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनी 98 हजार 579 मते घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
- विधानसभानिहाय मतांची आकडेवारी-
- औसा - राष्ट्रवादी - 51685, शिवसेना - 105189
- उमरगा- राष्ट्रवादी- 67226, शिवसेना -86902
- तुळजापूर - राष्ट्रवादी -88033, शिवसेना - 110315
- उस्मानाबाद- राष्ट्रवादी- 94767, शिवसेना -103179
- परंडा- राष्ट्रवादी - 78489 शिवसेना - 100567
- बार्शी- राष्ट्रवादी 84547, शिवसेना 85453
- 2014 ची परिस्थिती -
डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 मते मिळाली तर शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना 6 लाख 07हजार 699 एवढं मताधिक्य मिळाले होते. 2014 ते 2019 या लोकसभेच्या मिळालेल्या मतांचे गणित मांडले तर राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना 95 हजार 700 अधिक मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेचे मते घेऊन सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, असल्याचे पाहायला मिळाले.