उस्मानाबाद- जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजार पेक्षा अधिक झाली आहे. जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मात्र यातही सकारात्मक बाब म्हणजे कोरोनाबाधित असलेल्या गरोदर महिलेची दुसऱ्या वेळीचे सिझेरियन प्रसूती करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं आहे. महिला आणि बाळही सुखरूप असल्याने आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे.
लोहारा तालुक्यातील कोरोनाबाधित महिला ही उस्मानाबाद मधील स्त्री रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नऊ महिने पूर्ण होत आले होते, असे असतानाच तिला रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेचे या पूर्वी देखील एक सिझेरियन पद्धतीने डिलेव्हरी झाली होती.
यावेळी या महिलेस कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच तिची प्रसूती पुन्हा एकदा सिझेरियन पद्धतीने करायची होती. कोरोना बाधित रुग्णाची अशा पद्धतीने प्रसूती करणे हे डॉक्टरांसाठी एक आव्हानच होते. मात्र यावर मार्ग काढत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या टीमने काही खासगी डॉक्टरांना सोबत घेऊन महिलेवर सिझेरियन प्रसूती यशस्वीपणे केली आहे. विशेष म्हणजे या बाधित मातेचे बाळ कोरोनामुक्त असून कोरोना बाधिताची ही जिल्ह्यातीलच पहिलीच प्रसूती आहे.