नाशिक : आठ दिवसांपूर्वी मुलीच्या वादातून मुलीचे नातेवाईक अनिल दिनकर माळी याने गणेश माळी याला मारहाण केली होती. याचा वचपा काढण्यासाठी गणेश माळी याने अनिल माळीला कविता नामक मुलीचा मोबाईल नंबर असल्याचे भासवत व्हाट्सअपवर तीन दिवस मेसेज केले आणि सकाळी लासलगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलवले. यामुळे अनिल माळी व त्याचा मित्र पल्सर (MH15 BQ 4326) या मोटरसायकलवरून आले. बस स्थानकाच्या आवारात उभे असताना अनिल माळी याचे व्हॅन क्रमांक (MH 02 AV 1906) मधून अपहरण करत लासलगाव रेल्वे गेट जवळील साईनगर येथे काटेरी झुडपात उतरून दिले. यानंतर आरोपी गणेशने त्याच्या साथीदारासोबत मिळून अनिलला लोखंडी रॉड आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यानंतर अनिल माळीला सोडून देत आरोपी गणेशने पळ काढला.
अपहरण आणि दंगलीचा गुन्हा दाखल :लासलगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल होत लासलगाव बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने घटनेचा तपास सुरू केला. चार तासात या घटनेचा तपास लावल्यात लासलगाव पोलिसांना यश आले. याप्रकरणी अनिल माळी या फिर्यादीच्या जबाबावरून लासलगाव पोलीस ठाण्यात सात जणांवर अपहरण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात :यात आरोपी गणेश माळी (रा. नगरसूल येवला तालुका), सौरभ ठाकरे (रा. नगरसूल येवला तालुका), विशाल पवार (रा. नगरसूल येवला तालुका), विठ्ठल गवळी (रा. पिंपळगाव नजीक निफाड तालुका) यांना ताब्यात घेण्यात आले. रविंद्र पवार (रा. नगरसूल येवला तालुका), शंकर माळी (रा. नगरसूल येवला तालुका) व विठ्ठल गवळी याचा साथीदार अद्यापही फरार आहे. तिघांचा पोलीस शोध घेत आहे. मुलीच्या वादातून अनेकदा अपहरण आणि खूनाच्या घटना घडल्या आहे. ज्याचा पोलिसांनी शिताफीने तपास करत उलघडा केला आहे.