नाशिक - एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, म्हणून दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी घरपोच शासकीय वाहन घ्यायला आणि मतदान झाल्यावर त्यांना घरी पोहोचवायला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये ४१ हजार ४९१ दिव्यांग मतदार आहेत आणि त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये ९५०३ दिव्यांग मतदार आहेत. मतदान केंद्रात पाणी आणि मदतनीस यांची सोय असणार आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना मतदान करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
सरकारकडून दिव्यांग मतदारांसाठी खुशखबर! मतदानाकरता खास घरपोच वाहन व्यवस्था मनिष महाजन (दिव्यांग मतदार) -
सरकारने दिव्यांगाना मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर आणि मतदानानंतर घरी पोहचवण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली आहे. याचा सर्व दिव्यांग नागरिकांनी लाभ घ्यावा. सर्वांनी मतदानासाठी पुढे येऊन मतदानाचा आपला हक्क बजावावा. आपण जगाला दाखवून द्यावे की, आपण कुठल्याही गोष्टीमध्ये मागे नसून इतर माणसांप्रमाणे आपणही मतदानाचा हक्क बजावू शकतो.
दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत मतदानाच्या दिवशी पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता या अडचणी दूर होऊन शासनाच्या या योजनेमुळे दिव्यांग मतदारांची मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार आहे. दिव्यांग बांधव मतदानाचा अधिकार या वर्षी पूर्णपणे बजावणार आहेत.