नाशिक- मनमाड शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे त्वरित डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) उभारावे. येत्या ३ दिवसांत योग्य कार्यवाही झाली नाही, तर तीव्र स्वरुपाचे जनआंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. बहुजन आघाडीतर्फे याबाबतचे निवेदन मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ गोविंद नरवणे यांना देण्यात आले आहे.
मनमाड शहर हे सव्वा ते दीड लाख लोकसंख्या असलेले शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग राहतो. मनमाड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे जवळपास १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तरीही जिल्हा प्रशासन व वैद्यकीय अधिकारी मनमाड शहराकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत त्वरित दखल घेऊन मनमाड शहरात डीसीएचसी सेंटर तयार करावे, असे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आले.
मागील महिन्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होऊन यावेळी ८ दिवसांत मनमाड शहरात ऑक्सिजन बेडयुक्त कोविड सेंटर उभारण्याचे आदेशच देण्यात आले होते. मात्र, या आदेशाला सरकारी यंत्रणेने केराची टोपली दाखवली व मनमाड शहरात अजूनही कोविड सेंटर उभारले नाही. मात्र, यामुळे येथील जवळपास १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रोजी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख राजेंद्र पगारे, पी.आर निळे, कादीर शेख, संतोष भोसले, सुरेश जगताप, यशवंत बागुल, उमेश भालेराव, कैलास शिंदे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.