नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात कोणी नाही. मात्र, तसेच करताना धर्मातील श्रद्धांवर आघात होणार नाही. याची, काळजी घ्यायला हवी. ती काळजी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात न घेतल्याने गंभीर चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्याला विरोध करण्यात येत आहे, सरकारला संयुक्त चिकित्सा समितीकडे तो अभ्यासासाठी पाठवावा लागला होता. मात्र, सरकारने त्यात मांडलेले कोणतेही आक्षेप दूर न करता (2011)मध्ये केवळ नाव बदलून, हा कायदा परत आणला आहे. त्याला महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम असे फसवे नाव देऊन तो मंजूर करण्यात आला आहे असा आरोप साधू महंतांनी केला आहे.
कायदा सर्व धर्मियांना लागू :पहिला गुन्हा मुस्लिम भोंदुच्या विरोधात नांदेड येथे तर दुसरा गुन्हा नाशिक रोड येथे नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झालेला आहे. नंतर हिंदु आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी वीस घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.