नाशिक -नाशिकच्या पेठ तालुक्यामधून जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी श्रमजीवी संघटनेकडून जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक शासकीय रुग्णालयात गरोदर महिलेला मारहाण ?
नाशिक शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्यानंतर आपल्याला रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून मारहाण झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी श्रमजीवी संघटनेकडून जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे.
महिलेची प्रसुती झाली, तेव्हा डॉक्टर हजर नव्हते. या दरम्यान प्रसूती होऊन बाळ खाली पडल्यामुळे बाळाच्या डोक्याला मार लागल्याचा आरोप देखील पीडित महिलेने केला आहे. या घटनेत मात्र दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मारहाण करणारा सफाई कामगार व हलगर्जीपणा करणारे डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन श्रमजीवी संघटनेकडून नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले आहे. तर घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून या समितीच्या चौकशीत जे समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले.