नाशिक - खासगी रुग्णालयांच्या लुटमारी विरोधात प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने नाशिक महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेत प्रवेश न मिळाल्यावरून हा वाद पेटला असून प्रतिकात्मक तिरडी बांधून आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेतली
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु, या बिकट काळातसुद्धा खासगी रुग्णालयांचे आपले लुटमारीचे दुकान मात्र सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून होत असलेल्या नागरिकांच्या लूटमारी विरोधात आता प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
शनिवारी दुपारच्या सुमारास या लुटमारी विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन केले. यावेळी प्रशासन निद्रीस्त असून खासगी रुग्णालयांकडून नागरिकांच्या होणाऱ्या असं तिकडे प्रशासनाचे लक्ष नाही, या कोरोना काळात सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपदेखील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
खासगी रुग्णालयांमध्ये पीपीइ किटच्या दरात वाढ करून दीडशे रुपयाला मिळणारे पीपीइ किट हजार ते पंधराशे रुपयांना विकले जाते. पक्षाचे कार्यकर्ते आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी पीपीइ कीट घालून आलेले होते. परंतु, यावेळी आयुक्तांनी भेट न दिल्याने कार्यकर्त्यांनी थेट प्रतीकात्मक तिरडीच बनवून आयुक्तांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली
प्रशासनाने खासगी रुग्णालयांकडून होणारी नागरिकांची लूट थांबवावी. यासोबतच आयुक्तांनी स्वतः रुग्णालयांचा पाहणी दौरा करून नागरिकांची लूटमार करणाऱ्या रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.