नाशिक - कांद्याच्या दरात झालेली घसरण व चाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. केंद्र व राज्य शासनाने मिळून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. सद्यस्थितीत कांदाचाळीमधील कांद्याची स्थिती, बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा दर याविषयी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या सततच्या लॉकडाऊन, कांदा निर्यातीवर आलेल्या मर्यादा व देशांतर्गत कांद्याला मिळणारा कवडीमोल दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.