नाशिक - सुरगाणा तालुक्यातील माणी परिसरात विद्युत महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सुरगाणा-बार्हे रस्त्यावरून पाणी आणण्यासाठी जात असलेल्या दुचाकीवर विजेचा खांब कोसळून युवक जागीच ठार झाला आहे. तर एकजण शॉक लागून फेकला गेल्याने जखमी झाला आहे.
सुरगाणा तालुक्यातील माणी परिसरात विधुत मंडळाचा निष्काळजी पणामुळे मोठा अपघात घडून एका युवकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गावातील मुख्य रस्ता असलेल्या सुरगाणा ते बार्हे परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते.याच रस्त्यावर असलेला एक विद्युत खांब कोसळून बुधवारी सकाळी विजय रमेश कहांडोळे याचा मृत्यू झाला आहे.
गावात चायनीजचे दुकान असल्याने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास विजय हा आपल्या लहान भावासोबत पिण्याचे पाणी आणण्यासाठी आश्रम शाळा फाटा येथे जात होता. मात्र याच वेळी गावापासून काही अंतरावर रस्त्यात असलेला विद्युत वाहिनीचा खांब कोसळून विजेच्या तारा अंगावर पडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शॉक लागल्याने दूरवर फेकल्या गेलेल्या योगेश कहांडोळे याचा जीव बचावला असून तो घटनेत जखमी झाला आहे.
दरम्यान ग्रामस्थांच्या लक्षात ही घटना येतात त्यांनी दोघा भावंडांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. तर घटनेत जखमी झालेल्या योगेश वर सुरगाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सुरगाणा पोलिसात संबंधित घटनेची नोंद करण्यात आली असून माहिती मिळताच सुरगाणा पोलीस निरीक्षक दिवानसिग वसावे,उपनिरीक्षक सागर नाद्रे व त्याची टीम घटना स्थळी हजर होऊन त्यांनी पंचनामा केला आहे.
पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. या ठिकाणी विद्युत वाहिनीचे खांब व तारा जुन्या झाल्या असल्याची तक्रार अनेकदा परिसरातील स्थानिक नागरिकांनी विद्युत विभागाकडे केली आहे. मात्र याकडे विद्युत विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येतोय. याप्रकरणी विद्युत विभागातील संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी काय कारवाई करणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.