नाशिक - राज्यात आणि केंद्रातील सरकारला गेल्या साडेचार वर्षात प्रत्येक निर्णयात अपयश आले आहे. केंद्र सरकारची नोटबंदी प्रमाणे राज्यातील कर्जमाफीदेखील फसली आहे, शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. शेतकऱ्यांना हे सरकार १७ रुपयांची मदत देत आहे. मात्र, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे. हे सरकार म्हणजे लबाडाच्या घरचे अवताण असून जर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आले तर हुकूमशाही येईल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील सरकारवरही निशाणा साधला.
पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्याबद्दल बोलण योग्य नाही. पंतप्रधानांनी बोलताना जपून बोलले पाहिजे, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या रूपाने देशात आपत्ती आली आहे. त्यामुळे संकुचित विचार करणाऱ्यांच्या हातात हा देश नको असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.