मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकला ताब्यात घेण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी युवा नेते अमित ठाकरे हे 26 व 27 सप्टेंबरला नाशिकमध्ये येणार आहेत.
मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे नाशिकमध्ये दौरे सुरू झाले आहेत. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर पुन्हा मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी युवा नेते अमित ठाकरे झपाटून कामाला लागले आहेत. यासाठी ते सातत्याने नाशिक दौरा करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील महिन्यात नाशिक जिल्ह्यात महासंपर्क अभियान राबवण्यात आलं.
गणेश मंडळांना भेटी देणार-महासंपर्क अभियानामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याबरोबरच काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटीही त्यांनी घेतल्या आहेत. या कालावधीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक शहरातील चारही मतदारसंघ व सिन्नर तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. काही मंडळात ते आरती करणार आहेत. तर काही ठिकाणी देवदर्शन करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मनसेचे निष्ठवंत सोडून गेले-2009 च्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेचा बोलबाला होता. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार नाशिक शहरात निवडून आले होते. त्यात स्वर्गीय उत्तमराव ढिकले, वसंत गीते आणि नितीन भोसले यांचा समावेश होता. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे माजी आमदार वसंत गीते यांनी उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे. तर स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले हे भाजपा पक्षातून नाशिक पूर्व मतदार संघात आमदार म्हणून काम करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी माजी आमदार नितीन भोसले यांनी मुबईत शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.