नाशिक - कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेला लाॅकडाऊन शिथील झाल्याने आजपासून (सोमवार) उद्योगधंदे व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु होणार असून ठप्प झालेले अर्थचक्र पुन्हा फिरणार आहे. मात्र, राज्यशासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहणार असून दिलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी सबंधित आस्थापनांनी घ्यावी व नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
..म्हणून कोरोनाबाधितांचा आलेख खालावला
राज्यशासनाने १३ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात लाॅकडाऊन लागू केला व १ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नाशिकमध्ये वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर १२ ते २३ मे असा दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावला होता. बाजार समित्या व अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्योग बंद ठेवण्यात आले होते. किराणा दुकानांतून फक्त होम डिलव्हरी सुरु होती. भाजीपाला विक्रिवरही निर्बंध होते. या कडक निर्बंधांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आलेख खालावला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.