जायखेडा (नाशिक) - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जायखेडा ग्रामपंचायतीमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावात येणारे सर्व मार्ग बंद करून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य सॅनिटायझर गेट तयार करण्यात आला आहे. यामुळे गावात प्रवेश करणारे प्रत्येक वाहन व व्यक्तीला या गेटमधून जाणे बंधनकारक असल्याने निर्जंतुकीकरण होण्यास मोठी मदत होत आहे.
जायखेडा ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे, व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांची कल्पकता व कौशल्याचा योग्य वापर करून कमी खर्चात हा 'जुगाड' 'सॅनिटायझर गेट' तयार करून प्रेरणादायी व स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे तसेच नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.