दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील अनेक भागांत गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवले आहे. यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे वनविभागाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी केली आहे. यासंदर्भात कुंवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण (प्रादेशिक) यांना निवेदनही देण्यात आले आहे.
तालुक्यातील चौसाळा, कसबे वणी, उमराळेत पुणेगाव, कोल्हेर, भातोडे, अहिवंतवाडी, ननाशी, काजी माळे, हातनोरे, वाघाड धरण परिसर, कळवण तालुक्यातील पश्चिम भाग आणि पुनद खोऱ्यातील अनेक भागात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सागावर प्रथमच काळ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असे सांगितले. वेळीच या अज्ञात अळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास किंवा अळीने इतर झाडे आणि शेतांतील पिकांकडे आपला मोर्चा वळविल्यास शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून उपाय योजना कराव्यात, अशी मागणी डॉ. किशोर कुवर यांनी केली.