नाशिक - केंद्र शासनाने निर्यात बंदीकरून देखील कांद्याचे भाव नियंत्रणात आले नाहीत. त्यामुळे आयकर विभागाने लासलगाव परिसरातील नऊ कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले. आयकर विभागाने त्यांची कसून चौकशी देखील केली. याचाच परिणाम म्हणून आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
लासलगावातील कांदा व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे; बाजार समितीतील लिलाव बंद
देशातील कांद्याचे दर नियंत्रणात यावेत यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली. शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलने केली. या सर्व गोंधळात मात्र, कांद्याचे दर काही नियंत्रणात आले नाहीत.
केंद्र शासनाने कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यात बंदीची घोषणा केली आहे. तरीही कांद्याचे दर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बुधवारी आयकर विभागाच्यावतीने लासलगाव नऊ व पिंपळगाव येथील एका कांदा व्यापाऱ्याच्या आस्थापनेवर छापा टाकला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. यात कांदा खरेदी- विक्रीच्या पावत्या, कांदा विक्रीची बिले व कांदा साठवणुकीबाबत चौकशी करण्यात आली. आयकर विभागाच्या कारवाईमुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये याचा परिणाम दिसून आला. आज एकही कांदा व्यापारी लिलावासाठी उपस्थित राहिला नाही.
1998 पासून आजपर्यंतच्या 22 वर्षात 17 वेळी कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये आयकर विभागाच्या हाती नेमक काय लागले? चौकशी केलेल्या व्यापाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली? याबाबत एकदाही खुलासा झालेला नाही. या कारवाईबाबत जिल्हाभर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.