नाशिक: नाशिक जिल्ह्यात मागील दहा महिन्यात जन्माला आलेल्या बाळांपैकी 18 टक्के बाळ ही कमी वजनाची जन्माला आल्याचे दिसून आले आहे. यात कालावधी पूर्ण आधी जन्माला आलेल्या बाळांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. महिलांनी गरोदरपणात काय काळजी घ्यावी, याबाबत स्त्री रोगतज्ञ डॉ. मीनल रणदिवे ( Dr Minal Ranadive ) यांनी माहिती दिली.
बाळाचे वजन कमी असण्याची कारणे: कमी वजनाची बाळ जन्माला येण्याची कारणे अनेक असतात. यामध्ये कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच आठव्या महिन्यात बाळ जन्माला येणे, गर्भवती महिलेचे वय, महिलेला धूम्रपान, मद्यपानचे व्यसन, कुपोषित माता, आहाराबाबत योग्य काळजी न घेणे, आईला गंभीर आजार असणे, आईच्या गर्भात बाळाला योग्य रक्त पुरवठा न होणे, काही महिलांचे वजन कमी असल्याने त्यांना कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. अडीच किलो पेक्षा कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हटले जाते. अशा बाळांची विशेष दक्षता घ्यावी लागते, असे स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीनल रणदिवे (Dr Minal Ranadive ) सांगतात.
महिलांनी ही घ्या काळजी: महिलांनी कॉलेज पासून व्यवस्थित आहार घेणे गरजेचे आहे. बाहेरील फास्टफूड खाणे टाळावे, धूम्रपान, मद्यपानचे व्यसन करू नये, सुरूवातीपासून योगा, व्यायाम करावा. मानसिक आरोग्य चांगले राहील या कडे लक्ष द्यावे. लवकर जन्माला आलेल्या बाळांच्या सर्वात मूलभूत गरजा म्हणजे आईचे दूध, उबदारपणा, पुरेसे पोषण, काळजी, प्रेम हे असते. पहिल्या दिवसापासून त्यांना स्थिर तापमान 20 ते 25 डिग्रीपर्यंत असणे गरजेचे आहे. खेळती हवा त्यांना आवश्यक असते. बाळांना अधिक वेळ छातीशी, हातात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा व गाणी गाऊन त्यांच्याशी बोलून त्यांना सुरक्षित ऊबदार ठेवल्यास त्यांची वाढ चांगली होते.
अडीच किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ: सामान्यपणे जर मुलाचे जन्माची वजन अडीच किलो अर्थात (अडीच हजार ग्रॅम) पेक्षा कमी असेल तर त्यांना मुदतपूर्व म्हणून वर्गीकृत करण्याची प्रथा आहे. तथापि केवळ जन्माच्या वजनानुसार अकाली जन्माची व्याख्या नेहमीच वास्तविकतेशी जुळत नाही. बाळाचे वजन कमी असण्याची कारण अगणित असू शकतात.
जिल्हा रुग्णालयात संख्या अधिक: नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या बहुतांश माता या आदिवासी ग्रामीण भागातील कुपोषित असतात, त्यांचे पोषण व्यवस्थित झाले नसल्याने बालकांचे कुपोषण होणे साजित असते, तसेच बहुतांश क्रिटिकल केसेस देखील ग्रामीण भागातून जिल्हा रुग्णालयाकडे पाठवल्या जातात, त्यामुळे कमी वजनाची बाळ जन्माचे प्रमाण जिल्हा रुग्णालयात अधिक आहे.