नाशिक- सिन्नर तालुक्यातील सोनंबे येथे एका डॉक्टरने गुलमोहर बिल्डिंगच्या सातव्या मजल्याहून उडी मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गोविंद गारे असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. गोरे यांच्या विरोधात एका महिला रुग्णाने विनयभंगाची तक्रार केल्या नंतर काही तासातच त्यांनी आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गोविंद गारे सोमवारी (दि.13जानेवारीला) दुपारी सिन्नरला त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. उद्योग भवन येथील गुलमोहर बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरील सदनिकेत ते होते. यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास गारेंनी इमारतीच्या टेरेसहून उडी मारुन आत्महत्या केली.
काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आल्यानंतर नातलगांनी डोकावून पाहिले. यावेळी त्यांना डॉक्टर पार्किंगमध्ये पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
यानंतर त्यांना जवळच्या सिन्नर नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी व दोन अपत्य असा परिवार आहे.
सिन्नर पोलीस ठाण्यात महिलेने केली होती विनयभंगाची तक्रार
सिन्नर तालुक्यातील सोनाबेच्या बेंदवाडीतील एक महिला शनिवारी (दि. 11 जानेवारीला) सकाळी 11.30 च्या सुमारास डॉक्टरांकडे आली. पित्ताचा त्रास होत असल्याने ती स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. तपासणी केल्यानंतर डॉक्टरने विनयभंग केल्याचे महिलेने सांगितले. याबाबत तिने सोमवारी (दि.13जानेवारीला) सिन्नर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.