नाशिक -शहरात कुत्र्याच्या भुंकण्यावरून दोन कुटुंबीयांमध्ये झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी तक्रारदाराला लोकसभा निवडणुकीच्या शांततेचे कारण सांगून दोघांनाही प्रत्येकी २० हजार रुपयांचे जामीनदार देण्याबाबत नोटीस काढली. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीचा जाच सर्वसामान्यांना कुठपर्यंत सहन करावा लागणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
पोलिसांच्या कारवाईबद्दल माहिती देताना तक्रारदार शहरातील खुटवडनगरमधील लीलाबाई मोकळ यांच्याकडे एका विदेशी जातीच्या श्वानाचे १० महिन्यांचे पिल्लू आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला पाहून हे कुत्र भुंकते. सुरुवातीला त्याचा त्रास नव्हता. मात्र, काही दिवसांपासून हा त्रास वाढला होता. त्यावरून काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये शिवीगाळ होऊन भांडण झाले. याप्रकरणाबाबत मोकळ यांनी पोलिसांत तक्रार दिली. तसेच मुलीची दहावीची परीक्षा असल्याचे सांगून दुसऱ्या कुटुंबीयांनी तक्रार दिली.
चॅप्टर केस झाल्याने हा वाद सहाय्यक पोलीस आयुक्त शांताराम पाटील यांच्यापर्यंत पोहोचला. तिथे मोकळ यांच्या कुटुंबातील ३ व्यक्तींना हमीपत्र देणारे प्रत्येकी २ जामीनदार, तसेच सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचे शांतता राखण्याबाबतचे बंधपत्र देण्याबाबत आदेशित करण्यात का येऊ नये? अशी नोटीस काढण्यात आली. आचारसंहिता सुरू आहे. त्यात अशा भांडणामुळे शांतता भंग होत असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या नोटिशीबाबत २६ एप्रिलला पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणात अंबड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबीक पातळीवर तसेच शेजाऱ्यांशी सातत्याने वाद होत असतात. त्यात पोलिसांकडून अशी कारवाई सुरू झाल्यास सर्वसामान्य जनता पोलिसांपर्यंत पोहोचण्यापूर्वी १० वेळा विचार करेल, असे मत काही वकिलांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीचा आणि किरकोळ भांडणाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्याबाबतसुद्धा आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान कारवाई करणारे साहाय्यक पोलीस आयुक्त शांताराम पाटील सोमवारीच निवृत्त झाले आहेत.