नाशिक- आज देशात सर्वत्र उत्साहाने होळीचा सण साजरा केला जात आहे. नांदगाव तालुक्यातही रंगांची उधळण करून धूळवडीचा आनंद घेतल्या जात आहे. मात्र, तालुक्यातील बंजारा लोकांच्या तांड्यावर होळीच्या दुसऱ्या दिवसाला विशेष महत्व आहे. येथे धुळवडीच्या दिवशी वर्षभरात जन्माला आलेल्या मुलांचे नामकरण करत धुंड साजरी केली जाते. ही परंपरा कायम ठेवत आजही तालुक्यातील बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणात धुंड सण साजरा केला.
नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे, न्यायडोंगरी, माळेगाव यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे. होळीनंतर धुलीवंदनला हा समाज आपली शेकडो वर्षाची जुनी परंपरा असलेला धुंड उत्सव साजरा करतो. आजही या भागात सर्वच तांड्यांवर धुंड उत्सव साजरा करण्यात आला. वर्षभरात ज्या मुलांचा जन्म झाला त्यांचे नामकरण आज केले जाते. ज्या घरात मुलांचे नामकरण असते त्या घरातील आजी किंवा आईच्या मांडीवर लहान मुलाला पांढरा पोशाख घालून बसविले जाते आणि त्यांच्या डोक्यावर लाकूड आडवे धरून अन्य नातेवाईक त्यावर काठ्या मारून गाणी म्हणतात.