नाशिक - सिन्नर तालुक्यातील पांचाळे परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत स्विफ्ट कार आढळून आली आहे. ही कार बाहेर काढली असता त्यात हाडांचा सापळा राहिलेला मृतदेह आढळून आला आहे. या गाडीचे पुढचे टायर फुटलेले असल्याने अपघात होऊन गाडी विहिरीत पडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. गाडीत आढळलेल्या ओळख पत्रानुसार मूळचे मालेगावचे असलेले मात्र सध्या पुण्यात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक..! विहिरीत पडलेल्या कारमध्ये आढळला कुजलेला मृतदेह; मृत व्यक्ती २०१९ मध्ये बेपत्ता?
सिन्नर तालुक्यातील पांचाळेगावातील एका विहीरीत कारसह कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. टायर फुटल्याने अपघात होऊन ही गाडी विहिरीत पडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संजय अहिरे असे त्या ओळखपत्रावरील नाव असून तो मृतदेह त्यांचाच असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. अहिरे यांच्या नातेवाईकांनी नोव्हेंबर २०१९ साली वाकड पोलीस ठाण्यात संजय हरवल्याबाबत तक्रारही दाखल केली होती. दरम्यान या संपूर्ण घटनेचा नाशिक ग्रामीण पोलीस सध्या तपास करत आहेत.
५० फूट खोल विहीर-
पांचाळे शिवारातील शेतकरी सुधाकर बेदरकर हे शनिवारी आपल्या पिकांना पाणी घालण्यासाठी त्यांच्या विहिरीत पाण्याचा उपसा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना ५० फूट खोल असलेल्या विहिरीत एक स्विफ्ट कार पडलेली आढळली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ती कार विहिरातून बाहेर काढण्यात आली. त्यावेळी विहिरीमध्ये एक कुजलेला मृतदेह देखील आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.