नाशिक :शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लवकरच ठक्कर डोम येथे क्रेडाई मार्फत उभारण्यात आलेला कोविड केअर सेंटर सुरू करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. गमे यांनी शुक्रवारी विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी येत्या ४ दिवसात हे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. नाशिक शहरात दिवसाला सुमारे ५०० ते ६०० कोरोनाबाधितांची लक्षणीय प्रमाणात वाढ गेल्या महिनाभरापासून सातत्याने होत आहे. यामुळे शहरातील सर्वच शासकीय आणि खासगी अधिग्रहीत करण्यात आलेली रुग्णालये हाउसफुल झाल्याचे चित्र आहे. अशीच काही अवस्था शहरातील कोविड केअर सेंटरची देखील आहे.
या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात महिनाभरापूर्वी ठक्कर डोम परिसरात क्रेडाईच्या मदतीने नाशिक महानगरपालिकेने कोविड केअर सेंटर उभारले आहे. या कोविड केअर सेंटरचा शुक्रवारी मनपा आयुक्त यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. हे कोविड केअर सेंटर सर्व अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज आहे. तीनशे खाटांचे हे सेंटर येत्या चार दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यावेळी सांगितले आहे.
दरम्यान या ठिकाणचा पाहणी दौरा केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत. तसेच या कोविड सेंटरची पाहणी झाल्यानंतर आयुक्तांनी नाशिक रोड येथील कोविड केअर सेंटरला देखील भेट दिली. या ठिकाणी देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना सूचना देखील केल्या आहेत. एकंदरीत शहरातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविड केअर सेंटर आणि रुग्णालय हाऊसफुल झाल्याने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून वाढिव खाटांची उपलब्धता आणि इतर गोष्टींचा विचार करन्यास सुरवात झाली आहे. तसेच कोरोना विरोधात मनपा अधिकाऱ्यांनी कंबर कसल्याचेही बघायला मिळत आहे.