नाशिक - खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने केंद्र शासनाने खतांवर तातडीने सबसिडी द्यावी, तसेच मागील वर्षीच्या दराने शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
या कारणामुळे खतांच्या किमती वाढ -
कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोना काळामध्ये शेतमालाचे होणारे नुकसान त्यापाठोपाठ आस्मानी संकट आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारात खतांसाठी लागणारे रसायन महाग झाल्याने खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे बळीराजाचे कंबरडे पुन्हा एकदा मोडले असल्याने आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खतांवर तातडीने सबसिडी द्यावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.